Home Cities अमळनेर कळमसरेत तीन वृक्षांची कत्तल ; ग्रामपंचायतीची वनविभागाकडे तक्रार 

कळमसरेत तीन वृक्षांची कत्तल ; ग्रामपंचायतीची वनविभागाकडे तक्रार 


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नव्याने मंजूर इमारतीसमोरील तीन जिवंत कडुलिंबाची झाडे विनापरवानगी तोडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत ग्रामपंचायत कळमसरे यांनी वनविभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळमसरे येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम नुकतेच मंजूर झाले असून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यापूर्वी ठेकेदाराने जागेचा लाईनआउट देताना कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तीन कडुलिंबाची झाडे तोडल्याची बाब उघडकीस आली आहे. ही झाडे अंदाजे १० ते १२ वर्षे वयाची असून पूर्णपणे निरोगी अवस्थेत होती. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या झाडांची बेकायदेशीर तोड केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या संदर्भात ग्रामपंचायत कळमसरेचे सरपंच व उपसरपंच यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, पारोळा यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात संबंधित ठेकेदाराने कोणतीही शासकीय परवानगी किंवा वनविभागाची मंजुरी न घेता झाडांची तोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ही बाब गंभीर असून वनकायद्यानुसार संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरवर्षी शासनाकडून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी विविध मोहिमा राबविल्या जातात. अशा पार्श्वभूमीवर विनापरवाना जिवंत झाडांची तोड करणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे शासनाच्या प्रयत्नांना धक्का बसत असल्याची भावना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी वनविभागाने घटनास्थळी तातडीने पंचनामा करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बांधकामस्थळी नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने सादर केलेल्या निवेदनासोबत वृक्षतोडीचे छायाचित्रे व जागेचा उताराही जोडण्यात आला आहे.

सध्या या प्रकरणाकडे कळमसरे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांचे लक्ष लागून असून वनविभाग याची कितपत दखल घेऊन काय कारवाई करतो, याबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही घटना महत्त्वाची मानली जात असून दोषींवर योग्य ती कारवाई होण्याची मागणी जोर धरत आहे.


Protected Content

Play sound