Home क्राईम कंडारी हत्याकांड प्रकरणातील तीन संशयितांना अटक !

कंडारी हत्याकांड प्रकरणातील तीन संशयितांना अटक !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किरकोळ वादातून एका हातमजुरी करणाऱ्या जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) या तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात रविवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र हा पत्नी आणि तीन मुलांसह जळगाव येथे राहात होता आणि हातावर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. जितेंद्र साळुंखे हा एका कामानिमित्त जळगाव शहरातील आपल्या तीन मित्रांसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे गेला होता. याच वेळी त्यांच्यात अज्ञात कारणावरून किरकोळ वाद सुरू झाला. या वादातून तीन संशयित आरोपींनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात जितेंद्र हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जितेंद्र यांच्या पत्नी आणि तीन मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तसेच गेंदालाल मिल परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने अवघ्या काही तासात तीन संशयित आरोपी राज उर्फ बाबू अशरक सपकाळे, वय ३८, मयूर उर्फ विक्की दिपक अलोने, वय ३२, दोन्ही राहणार शिवाजी नगर जळगाव आणि दीपक वसंत शंखपाळ, रा. कंडारी, भुसावळ यांना अटक केली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound