लाठी शाळेतील मनपा कार्यालयात डल्ला मारणाऱ्‍या तीन संशयितांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील लाठी शाळेत असलेल्या मनपा कार्यालयातील तीन संगणक, दोन प्रिंटर्स व इन्व्हर्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जुलै महिन्यात घडली होती. या चोरट्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून चारपैकी तीन जणांना पकडण्यात यश आले आहे. 

यात अविनाश रामेश्वर राठोड (२१, रा. रामेश्वर कॉलनी), दीपक जयलाल पटेल (१९, रा. कुसूंबा) व आकाश उर्फ राधे अजय सोनार (रा. लक्ष्मीनगर) असे अटक केलेल्या संशयित चोरट्यांची नावे असून  असून गणेश भास्कर सोनार हा चौथा संशयित फरार आहे.

७ जुलै रोजी लक्ष्मीनगर परिसरातील लाठी शाळेमधील महानगरपालिका संस्थेच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तीन संगणक, दोन प्रिंटर्स आणि एक इन्व्हर्टर असे एकूण ६९ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लक्ष्मीनगरातील एका घरात बसून संगणक व प्रिंटर विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने लक्ष्मीनगरातील त्या घरात अचानक धाड टाकली. त्यावेळी पोलिसांना अविनाश राठोड व दीपक पटेल हे दोघ चोरीच्या संगणकासह आढळून आले. दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी लाठी शाळेतील मनपा कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली. तसेच संगणक व प्रिंटर पोलिसांना काढून दिले.

अविनाश व दीपक यांच्या चौकशी सुरू असताना चोरीच्यावेळी आकाश सोनार व गणेश सोनार हे दोन साथीदार त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यानुसार आकाश याचा तपास केला असता, तो लक्ष्मीनगरातील घरीच असल्याची पोलिसांना माहिती मिळाली़ पोलिसांनी त्याच्या घरी जावून झडती घेतली. त्यावेळी एक गावठी पिस्तोलसह ६ जिवंत काडतूस व एक छऱ्‍याची पिस्तोल, तलवार, लोखंडी सुरा घरात सापडून आले. पोलिसांनी हत्यार व पिस्तोल जप्त करीत आकाशलाही अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, संजय हिवरकर, राजेश मेढे, रवी नरवाडे, सुनील दामोदरे, पंकज शिंदे, अविनाश देवरे, भगवान पाटील, सचिन महाजन, नंदलाल पाटील, महेश महाजन, जयंत चौधरी आदींच्या पथकाने केली आहे. तिन्ही संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Protected Content