काश्मिरातील चकमकीत तीन अतिरेकी ठार ; एक जवान शहीद

श्रीनगर, वृत्तसंस्था । काश्मीरमधील पंथाचौक येथे शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या संयुक्त चौकीवर हल्ला केला. मोटरसायकलवर आलेल्या तीन दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला आणि ते पळून गेले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांच्या अतिरिक्त जवानांनी संपूर्ण परिसराला घेरले. नंतर झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. तर ३ दहशतवादी ठार झाले. शहीद झालेला जवान जम्मू आणि काश्मीर पोलिसांचा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आहे.

पोलिसांच्या पथकाने पंथाचौक परिसरात नाकाबंदी केली होती. नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात होती. या दरम्यान एका मोटरसायकलवर तीन दहशतवादी आले. त्यांनी नाक्यावर पोहोचताच पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला .

जवानांनी देखील या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हे पाहताच दहशतवाद्यांनी पंथाचौकातून पळ काढला. त्यानंतर परिसरात तैनात असलेल्या अतिरिक्त जवानांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली. एका मोहल्ल्यात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्या परिसराला घेराव घातला. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केल्यावर चकमक सुरू झाली.

Protected Content