Home Cities जळगाव जनगणना 2027 साठी मनपात तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला सुरुवात 

जनगणना 2027 साठी मनपात तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला सुरुवात 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेत क्षेत्रीय प्रशिक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर सुरू झाले असून, या शिबिरातून अचूक, विश्वासार्ह आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम जनगणना प्रक्रिया राबविण्याचा महत्त्वाचा पाया घातला जात आहे.

जनगणना संचालनालय, महाराष्ट्र आणि आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण शिबिर 9 एप्रिल ते 11 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडत आहे. देशाच्या विकास आराखड्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जनगणना प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशिक्षकांना प्रत्यक्ष कामाशी संबंधित सर्व बाबींचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे.

या शिबिराचे उद्घाटन उपायुक्त श्रीमती निर्मला गायकवाड-पेखळे यांच्या उपस्थितीत झाले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात जनगणना कार्याचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करताना प्रत्येक प्रशिक्षकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन केले. जनगणना ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या धोरणात्मक निर्णयांचा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सदर प्रशिक्षण शिबिरात शहरी भागासाठी नियुक्त करण्यात आलेले एकूण 17 फिल्ड ट्रेनर्स सहभागी झाले आहेत. त्यांना जनगणनेच्या विविध टप्प्यांची माहिती देताना माहिती संकलनाच्या आधुनिक पद्धती, डिजिटल साधनांचा वापर, डेटा एंट्रीतील अचूकता, तसेच क्षेत्रीय अडचणींचे निराकरण याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले जात आहे. यामुळे प्रशिक्षकांना प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यास मदत होणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान ज्ञानेश्वर सपकाळे, तहसीलदार, बोदवड आणि हर्षल नेमाडे, विभाग प्रमुख, शासकीय तंत्रनिकेतन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रांमध्ये जनगणना प्रक्रियेतील तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींचे सविस्तर विश्लेषण करण्यात येत असून, प्रशिक्षकांना अधिक सक्षम बनविण्यावर विशेष भर दिला जात आहे.


Protected Content

Play sound