Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसीय बीसीएमई कार्यशाळा उत्साहात

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसीय बीसीएमई कार्यशाळा उत्साहात

0
101

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  वैद्यकीय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसीय बेसिक कोर्स इन मेडिकल एज्युकेशन (बीसीएमई) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडलेल्या या कार्यशाळेत महाविद्यालयातील ३० हून अधिक शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. वैद्यकीय शिक्षणातील अध्यापन तंत्र, मूल्यमापन पद्धती, नैतिकता आणि संवादकौशल्य या विषयांवर सखोल चर्चा या कार्यशाळेदरम्यान करण्यात आली.

या कार्यशाळेचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, तसेच रजिस्ट्रार प्रमोद भिरूड उपस्थित होते. एमएनसी ऑब्झर्व्हर म्हणून डॉ. चित्रा नेतारे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण विभागाचे समन्वयक डॉ. अनंत बेंडाळे तसेच प्राध्यापक डॉ. कैलास वाघ, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. बापूराव बिटे, डॉ. मिलींद जोशी, डॉ. मयूर मुठे, डॉ. माया आर्विकर, डॉ. शुभांगी घुले आणि डॉ. सारंग दह्याभाई यांनी विविध सत्रांमध्ये सहभाग घेत मार्गदर्शन केले.

पहिल्या दिवशी गट गतिशीलता, शिक्षणाची प्रक्रिया, सीबीएमईचे ध्येय आणि शिकवणी पद्धती या विषयांवर डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. कैलास वाघ, आणि डॉ. दिलीप ढेकळे यांनी व्याख्याने दिली. अंतर्गत व रचनात्मक मूल्यमापनावर डॉ. अनंत बेंडाळे आणि डॉ. बापूराव बिटे यांनी शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय शिक्षणातील नैतिकता, संवादकौशल्य आणि इटकॉम 2 या विषयांवर भर देण्यात आला. डॉ. मयूर मुठे आणि डॉ. माया आर्विकर यांनी या सत्रात आधुनिक आणि नवोन्मेषी पद्धती स्पष्ट केल्या. प्रभावी क्लिनिकल आणि व्यावहारिक कौशल्य अध्यापनावर डॉ. कैलास वाघ आणि डॉ. मिलींद जोशी यांनी प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले.

तिसऱ्या दिवशी डॉ. दिलीप ढेकळे यांनी अध्यापन आराखडा तयार करण्याची पद्धत स्पष्ट केली. डॉ. अनंत बेंडाळे आणि डॉ. बापूराव बिटे यांनी क्लिनिकल कौशल्यांचे मूल्यमापन या विषयावर चर्चा केली. लर्निंग-कॅपेसिटी आणि टीएलएम मूल्यांकन या गटकार्याद्वारे डॉ. शुभांगी घुले यांनी सहभागी शिक्षकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. शेवटच्या सत्रात डॉ. निलेश बेंडाळे यांनी वैद्यकीय शिक्षणातील क्षमतांसाठी वेळापत्रक तयार करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या शेवटी सर्व सहभागी शिक्षकांनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. “ही कार्यशाळा वैद्यकीय शिक्षकांसाठी आत्मपरीक्षण आणि अध्यापनात सुधारणा घडवून आणणारी ठरली,” असे सहभागी शिक्षकांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत, श्रुती, समीर, शहमा, शैलेश आणि रूत्वीक यांनी केले.

या तीन दिवसीय कार्यशाळेद्वारे वैद्यकीय शिक्षणातील अध्यापन आणि मूल्यमापनाच्या आधुनिक संकल्पनांना नवसंजीवनी मिळाली. शिक्षकांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण अधिक परिणामकारक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याचा संकल्प व्यक्त केला.


Protected Content

Play sound