एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एका उपशिक्षकासह त्यांच्या मित्राची झालेली बदली रद्द करण्यासाठी एक पगार म्हणजेच ७५ हजार रूपयांची लाच चेकच्या स्वरूपात स्वीकारतांना आज एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापकाला अटक केली आहे. यात संस्थेचे अध्यक्ष आणि लिपिकाचाही समावेश आढळून आला असून या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, यातील तक्रारदार हे श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ,जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उप शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. या संस्थेने तक्रारदार यांची व त्यांचे उप शिक्षक या पदावर कार्यरत असलेले सहकारी मित्र अशा दोघांची बदली दि.०१ एप्रिल २०२३ रोजी एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कुल,धरणगाव येथे केली होती. या बाबतचा मंजुरीसाठीचा प्रस्ताव दि.०२ मे रोजी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
दरम्यान, संबंधीत तक्रारदार यांची व त्यांचा सहकारी उप शिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळणेसाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठविण्यात येईल असा निरोप त्यांना मिळाला. या अनुषंगाने मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव आणि कनिष्ठ लिलीक नरेंद्र उत्तम वाघ यांनी तक्रारदार व त्यांचे सहकारी उप शिक्षक यांचेकडे स्वत:सह सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव संचलित महात्मा फुले विद्यालय एरंडोलचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन यांच्यासाठी दोघांचा पुर्ण महिन्याचा एक पगार म्हणजेच तक्रारदार यांना ७५,०००/-रुपये चेक स्वरूपाने लाचेची मागणी केली. ही रक्कम चेकच्या स्वरूपात घेण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आले.
दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे याबाबत तक्रार केली. यानुसार एसीबीचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने आज महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव यांना चेक स्विकारतांना रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्थानकात विनोद शंकर जाधव, (वय-४२ वर्ष, मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल ) रा.योगेश्वर नगर,कजगाव रोड,पारोळा;
नरेंद्र उत्तम वाघ, ( वय-४४ वर्ष, कनिष्ठ लिपीक, महात्मा फुले हायस्कुल,एरंडोल ) रा.समर्थ नगर,भडगाव रोड,पाचोरा आणि विजय पंढरीनाथ महाजन, ( वय-५६ वर्ष, अध्यक्ष, श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ,जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल ) रा.माळी वाडा, एरंडोल या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक एन.एन.जाधव; पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.सचिन चाटे;.एस.के.बच्छाव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव;स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांच्या पथकाने केली.