भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातून सेवानिवृत्त असलेल्या व्यक्तीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे उघडकीला आले आहे. दुचाकी चोरी प्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी तिघांना अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, प्रकाश देवलाल जैन (वय-६१) रा. दत्त नगर, वांजोळा रोड, भुसावळ हे सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ५ मे रोजी सकाळी ११ ते ११.२० वाजेच्या दरम्यान ते कामाच्या निमित्ताने भुसावळ रेल्वे स्थानकावर दुचाकी (क्रमांक एमएच १९ सीए ३८४२) ने आले. स्टेशनजवळील दर्गाजवळ ते दुचाकी पार्क करून बाहेर गेले. दरम्यान ११. २० वाजेच्या सुमारास ते दुचाकीजवळ आले असता दुचाकी मिळून आली नाही. प्रकाश जैन यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील स.फौ.अशोक महाजन, स.फौ.शरीफ काझी, पो.ना.युनुस शेख, पोना किशोर राठोड, पोकाँ. विनोद पाटील, पोकाँ रणजित जाधव यांनी सापळा रचून संशयित आरोपी विशाल मधुकर इखे (वय 24, रा. चिचोली ता.जळगाव), गोपाल राजेद्र पाटील (वय 23, चिचोली ता.जळगाव), ज्ञानेश्वर शिवाजी हेमाडे (वय 30, रा. चिचोली ता.जळगाव) या तिन्ही संशयितांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केली आहे. तिघांवर भुसावळ बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे करीत आहे.