मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या लसीकरणाची तयारी सुरू असतांनाच आता काही राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यू या रोगाने डोके वर काढल्याचे दिसून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
कोरोनाच्या आपत्तीचा प्रतिकार करतांना आरोग्य यंत्रणांचा कस लागला आहे. यातच आता बर्ड फ्ल्यूचे संकट समोर उभे ठाकले आहे. राजस्थानात अचानक हजारो कावळ्यांचा मृत्यू झाला असून त्या कावळ्यांना संसर्गजन्य बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राजस्थानातील कोटा, झालवार, बरा आणि जोधपूरमध्ये हजारो कावळे मृतावस्थेत सापडले. काही ठिकाणी किंगफिशर आणि मॅगपाईज चिमण्यांचाही मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
केरळमधील अलाप्पुझा आणि कोट्टयम या जिह्यांमध्ये बदकांमध्ये बर्ड फ्लू आढळल्याने हाय अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. रोग पसरू नये म्हणून या जिह्यांमधील ५० हजार बदकांची कत्तल करण्यात आली असून संबंधित शेतकर्यांना त्याची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. तर, हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील पोंड डाम सरोवरात १८०० स्थलांतरीत पक्षी मृतावस्थेत आढळले. त्यांचे नमुने चाचणीसाठी बरेली येथील व्हेटरीनरी रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये पाठवण्यात आले होते. त्यांच्यात बर्ड फ्लूचे विषाणू आढळले. यासोबत इंदूर येथे मृतावस्थेत आढळलेल्या ५० कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळला आहे.
बर्ड फ्लूचे विषाणू विविध प्रकारचे आहेत. त्यातील एच-७ जातीचा विषाणू हा अत्यंत घातक समजला जातो. बर्ड फ्लूचा विषाणू हा एका देशातून दुसर्या देशात स्थलांतरीत पक्ष्यांच्या मार्फत पसरू शकतो. आता देशातील अनेक राज्यांमध्ये हा विकार आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.