चोपडा, प्रतिनिधी | चोपडा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय) व रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) तसेच अन्य मित्र पक्षांचे उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांनी आज (दि.०१) रोजी दुपारी आपला उमेदवारी अर्ज उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्याकडे दाखल केला.
यावेळी त्यांच्यासोबत महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, राष्ट्रवादीचे नेते गफार मलिक, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष छन्नू झेंडू पाटील (गोरख तात्या) काँग्रेस (आय)चे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ मनीषा चौधरी, पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, महिला नेत्या विजयाताई पाटील, नीलिमा पाटील, नगरसेविका, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील आदींसह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
तत्पुर्वी राष्ट्रवादीचा मेळावा गो.भी. जीनिंग सुंदर गढीरोड येथे सकाळी ११.०० वाजता सुरू झाला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. सगळ्यांनी आपापल्या भाषणात जगदीशचंद्र वळवी हेच निवडून येतील, असा दावा केला. यावेळी अॅड. घनश्याम पाटील, दिलीप पाटील, यांच्यासह अनेकांनी आपल्या भाषणात भाजपा सरकार कसे अपयशी ठरले आणि आता परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. जेष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानापासून वाजत-गाजत मिरवणुकीने सगळेजण अर्ज दाखल करण्यास गेले. ही मिरवणूक गोलमन्दिर, मेन रोड, आझाद चौक, पाटील दरवाजा शिवाजी चौक,आंबेडकर चौक, मेन रोड वरून तहसील कचेरीवर पोहोचली. मोठ्या जनसमुदाय साक्षीने तेथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे,काँग्रेस (आय)चे व मित्र पक्षाचे सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.