मुंबई-वृत्तसेवा | आधार कार्डच्या नव्या फॉरमॅटमध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने केलेल्या बदलाचा थेट परिणाम आता वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) काढणाऱ्या नागरिकांवर होत असल्याचे समोर आले आहे. आधार कार्डातील पत्त्याच्या रकान्यातून वडिलांचे नाव वगळण्यात आल्यामुळे परिवहन विभागाच्या ‘सारथी’ पोर्टलवर अर्ज सादर करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून हजारो अर्ज अर्ध्यावरच अडकले आहेत.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार कार्डच्या नवीन स्वरूपात पत्त्याच्या विभागातून वडिलांचे नाव काढून टाकले आहे. मात्र, परिवहन विभागाच्या नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करताना वडिलांचे नाव नमूद करणे बंधनकारक आहे. बहुतांश नागरिक आधार ई-केवायसीच्या माध्यमातून अर्ज भरत असल्याने ही माहिती थेट आधारवरून घेतली जाते. परंतु आधारमध्ये वडिलांचे नाव उपलब्ध नसल्याने ‘सारथी’ पोर्टलवर संबंधित रकाना रिकामा राहत असून अर्ज सबमिट होत नाही.

याशिवाय आधारमधील माहिती लॉक असल्यामुळे अर्जदारांना स्वतःहून वडिलांचे नाव टाकण्याची मुभाही मिळत नाही. परिणामी नागरिकांना वारंवार आरटीओ कार्यालयाचे फेरे मारावे लागत असून वेळ आणि पैशाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि तरुण अर्जदारांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याची तक्रार आहे.
दरम्यान, या समस्येकडे ‘महाराष्ट्र व्हीएलई संवाद’ संघटनेने लक्ष वेधले आहे. संघटनेच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याच्या परिवहन मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
संघटनेचे प्रतिनिधी शंकर होला यांनी ‘सारथी’ पोर्टलमध्ये तातडीने सुधारणा करून वडिलांचे नाव मॅन्युअली भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच राष्ट्रीय माहिती केंद्राने सारथी सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करावेत, आधारमध्ये वडिलांचे नाव नसल्यास पर्यायी कागदपत्रावरील माहिती स्वीकारावी आणि तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत नागरिकांची अडवणूक थांबवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी परिवहन विभाग आणि केंद्र सरकार कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. डिजिटल प्रक्रियेच्या युगात अशा तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



