
यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या जोरदार वादळाने मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला असून शेती, वाहतूक आणि शैक्षणिक संस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली, तर हजारो केळीची झाडे जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी रविवारी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

शनिवार, ६ जून रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास आलेल्या वादळामुळे भुसावळ-यावल आणि फैजपूर मार्गावरील अनेक मोठे वृक्ष रस्त्यावर कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी तातडीने संबंधित यंत्रणांना सूचना देत रस्त्यांवरील पडलेले वृक्ष हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
वादळाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला आहे. राजोरा परिसरातील अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. विशेषतः शेतकरी सतीश रूपचंद पाटील यांच्या शेतातील तब्बल पाच हजार केळीची झाडे वादळामुळे कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागाही जमीनदोस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वढोदे प्र. सावदा येथील एका इंग्लिश मीडियम शाळेचे पत्रेही वादळाच्या वेगवान वाऱ्यामुळे उडून गेले. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे त्या वेळी विद्यार्थी उपस्थित नव्हते. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली. मात्र शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून दुरुस्तीसाठी खर्च करावा लागणार आहे.
वादळाचा फटका सांगवी, राजोरा, पिंपरूड, वढोदे प्र. सावदा, अंजाळे आदी गावांना बसल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. नुकसानाची माहिती मिळताच आमदार अमोल जावळे यांनी तहसील प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागांचा सर्वेक्षण सुरू केले आहे. रविवारी, ७ जून रोजी आमदार अमोल जावळे यांनी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्यासह राजोरा, वढोदे प्र. सावदा आणि अंजाळे परिसरातील नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित गावांचे तलाठी तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांशी संवाद साधताना नुकसानग्रस्तांना शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आमदार जावळे यांनी दिले.



