मुंबई, वृत्तसेवा | संकटकाळी निवडणुकांचा विचार तरी कसा येतो, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला हाणला. पूरग्रस्त बांधवांसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी उभे राहायला हवे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. पुराच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी राज यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले. शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आज दुपारी शिवसाहित्य मदतीचे ट्रक , अॅम्बुलेंस शिवाजी पार्क, दादर येथून सांगली, कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, औषधे, खाण्याचे साहित्य अशी मदत शिवसेनेतर्फे करण्यात आली. यासंदर्भातली माहिती घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांना पुरासंदर्भात होत असलेल्या राजकारणाविषयी विचारले असता त्यांनी ‘त्याविषयी आता काही बोलण्याची वेळ नाही,’ असे म्हणत उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, ‘मला राजकारणात पडायचे नाही. जे जे आवश्यक आहे, ते करणं मला महत्त्वाचं वाटतं. आधी ज्यांची घरे वाहून गेली आहेत. त्यांना मदत करणं गरजेचे आहे.’ ‘वातावरण बदल होतोय. मुंबईतही महिनाभराचा पाऊस एका दिवसात पडला. याविषयीचा विचार, त्यावर मात करणारी यंत्रणा निर्माण करण्यासाठी तज्ञ्जांनी विचार करायला हवा,’ असं मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते.