मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील मातोश्री निवासस्थानी ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांनी आज भेट दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले व आशीर्वाद घेतले. यावेळी रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांच्या पादुकांचे पूजनही केले. या भेटीनंतर मातोश्री बाहेर पडताच पत्रकारांनी शंकराचार्यांना गराडा घातला. त्यावेळी बोलताना शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.
आम्ही सगळे सनातन धर्म पाळणारे लोक आहोत. पाप-पुण्य मानणारे लोक आहोत. सर्वात मोठा घात गौ घात सांगितला गेला आहे. मात्र त्यापेक्षाही मोठा घात विश्वासघात आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी हा विश्वासघात झाला आहे. हिंदू धर्मात विश्वासघात हे पाप आहे. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही. विश्वासघात सहन करणारा हिंदू होऊ शकतो, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या विश्वासघातामुळे आमचेही मन दु:खी झाले आहे. लोकांच्या मनात ते दु:ख आहे. कालच निवडणुकीत ते सिद्धच झाले आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसत नाहीत तोपर्यंत हे दु:ख हलकं होणार नाही असेही शंकराचार्य म्हणाले. आम्हाला राजकारणाशी घेणेदेणे नाही. जे सत्य आहे, ते आम्ही बोलतो. पाप-पुण्याबद्दल राजकारणी थोडेच बोलणार, त्याबद्दल तर धर्माचार्यच बोलणार ना, असा प्रतिसवाल अविमुक्तेश्वरानंद यांनी केला.