मुंबई, वृत्तसंस्था | शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नवे सरकार राज्यात सत्तेवर येणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी काही नेत्यांचा विरोधाचा सूर कायम आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी संभाव्य आघाडीला कडाडून विरोध दर्शवला आहे. ‘शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सहभागी होणे म्हणजे काँग्रेसला गाडून टाकण्यासारखे आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.
ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडीवर तोफ डागली आहे. ‘काही वर्षांपूर्वी काँग्रेसने बहुजन समाज पक्षासोबत आघाडी करून चूक केली होती. तेव्हा असा धुव्वा उडाला होता की, अजूनही काँग्रेस त्यातून सावरली नाही. महाराष्ट्रात आम्ही पुन्हा तीच चूक करत आहोत. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सहभागी होणे म्हणजे स्वत:ला जमिनीत गाडून घेण्यासारखे आहे. काँग्रेस अध्यक्षांनी कुठल्याही दबावाखाली निर्णय घेऊ नये, त्यातच पक्षाचे भले आहे,’ असे निरुपम यांनी म्हटले आहे.
एकेकाळी शिवसेनेत असलेले संजय निरुपम काँग्रेसकडून खासदार राहिले आहेत. काँग्रेसने त्यांना मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारीही दिली होती. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीतून त्यांना पायउतार व्हावे लागले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत समर्थकांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी प्रचारावर बहिष्कार घातला होता. काँग्रेसला मुंबईत एखादी जागा मिळेल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले होते. आता काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेच्या दिशेने जात असताना त्यांनी त्यांना सावध करण्याचा सूर लावला आहे.