जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात निंदणीसाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाला सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना पाळधी खुर्द ता.धरणगाव येथे ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना रात्री ८ वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करण राजू बारेला (वय-१३) रा. वैजापूर ता.चोपडा ह.मु. पाळधी खुर्द ता.धरणगाव असे मयत मुलाचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील रहिवाशी राजू बारेला हे त्यांची दोन मुले आणि पत्नी सह धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द गावात वास्तव्याला आहे. शेतमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. राजू बारेला यांचा लहान मुलगा करण बारेला हा गुरूवार ३१ ऑगस्ट रोजी गावातील शेतात निंदणीच्या कामासाठी त्याच्या काकू सोबत गेलेला होता. दुपारी शेतात काम करत असतांना त्याच्या पायाला सापाने चावा घेतला. तो बेशुध्द पडल्याने शेतात काम करणाऱ्या मजूरांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना रात्री ८ वाजता प्राणज्योत मालविली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत करणच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.