दीपनगर केंद्रातील नवीन प्रकल्पाच्या सुरक्षा यंत्रणेचे तीनतेरा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील 660 मे.वॅ.नवीन प्रकल्पाच्या सुरक्षा यंत्रणेबाबत लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने वारंवार प्रसार माध्यमातून बातम्या प्रदर्शित करून सुद्धा महाजेनको प्रशासन आणि मे.भेल प्रशासन यांनी प्रकल्पाच्या औद्योगिक सुरक्षेबाबत कुठलेही ठोस पाऊले उचलले नाही. याउलट प्रसारमाध्यमांना मिळणारी माहिती मिळू नये याकरिता मे.भेल प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

29 नोव्हेंबर 2024 रोजी बॉयलर मध्ये 72 मीटर उंचीवर वेल्डिंगचे काम सुरू असतांना वेल्डिंगच्या ठिणग्यांनी आग लागली.सदर आगीच्या ठिकाणी आग विझवण्यासाठी कोणतेही अग्निशामक यंत्र अथवा कुठली पर्यायी व्यवस्था उपलब्ध नव्हती. सदर वेल्डिंगचे काम इंडवेल कंपनीकडून केले जात होते आणि या कंपनीमध्ये बऱ्याच दिवसांपासून कोणताही औद्योगिक सुरक्षा अधिकारी कार्यरत नाही आणि या सुरू असलेल्या कामा ठिकाणी कुणीही सुपरवायजर नव्हता. तसेच कंपनीच्या कामगारांना कंपनीमार्फत कोणती सुरक्षा साधने आज पावेतो पुरविली गेली नाहीत.
सदर ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता टाळता येत नव्हती कारण त्या ठिकाणी बऱ्यापैकी भरलेल्या ऑक्सिजन सिलेंडर आणि हायड्रोजन सिलिंडरचा साठा ठेवलेला होता. कामाच्या ठिकाणी काही मजूर कानात हेडफोन लावून मोबाईल पाहण्यात मग्न झालेले दिसत होते आणि त्यांच्या पायात सेफ्टी शूज नसल्याचे आढळले. तसेच .30 नोव्हेंबर 2024 रोजी के.ऐस.एल.कंपनीचे रोहित्राच्या कामाठिकाणी कंपनीचे अभियंता बिना सेफ्टी बेल्टने काम करतांना व्हिडीओमध्ये दिसत असून विशेष म्हणजे सदर काम मे.भेल कंपनीचे अभियंता दिपक साहू कामाठिकाणी स्वत: उभे राहून असुरक्षितपणे काम करतांना दिसत आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल कंपनीचे प्रकल्प संचालक डी.जे.जवादे यांना वेळोवेळी याबाबत लाईव्ह ट्रेंड्स प्रतिनिधींनी प्रकल्पाच्या औद्योगिक असुरक्षितेबाबतच्या त्रुटी निदर्शनास आणून सुद्धा त्यांच्याकडून काडीमात्र कार्यवाही आजपर्यंत केली गेलेली नाही. तसेच महाजनको प्रशासनाला याबद्दल कल्पना दिली गेल्यानंतर ते फक्त भारत हेवी इलेक्ट्रिकल कंपनी वरती पेनल्टी चार्जेस लावून मोकळे होतात. तरी सर्व प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन महाजेनको प्रशासनाने आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल कंपनी प्रशासनाने औद्योगिक सुरक्षेबाबत योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी.

Protected Content