जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळके ते वावडदा रोडवरील महावितरण कंपनीच्या मालकीचे ५ लाख रूपये किंमतीचे १८ इलेक्ट्रिक पोलवरील ५ हजार २०० मीटर लांबीची ॲल्युमिनियम तार (कंडक्टर) चोरी झाल्याचा प्रकार ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके गावापासून वावळदा गावाकडे जाणाऱ्या रोडवर सुधाकर येवले यांच्या शेतापासून ते गुप्ता यांच्या रिसॉर्टपर्यंत असलेल्या १८ इलेक्ट्रिक पोलवरील ३३ के.व्ही. ची ॲल्युमिनियम तार चोरीला गेली आहे. या तारेची लांबी सुमारे ५ हजार २०० मीटर असून, त्याची किंमत अंदाजे ५ लाख रुपये आहे. अज्ञात चोरट्यांनी हा मुद्देमाल चोरून नेला आहे. सार्वजनिक ठिकाणी, विजेच्या खांबावरून इतक्या मोठ्या प्रमाणात तार चोरीला गेल्याने पोलिसांपुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. याप्रकरणी वीज कंपनीसाठी काम करणारे कंत्राटदार, ३२ वर्षीय अनिस नसिम अहमद यांनी या घटनेची फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुरूवारी १८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोहेका किरण पाटील करत आहेत.




