
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या सावखेडा शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री चार शैक्षणिक संस्थांना लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ ते २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी वर्धमान सीबीएससी स्कूल, जी.एस. रायसोनी पब्लिक स्कूल, शानबाग शाळा आणि गुरुकुल किड्स या चार शाळांच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी विशेषतः शाळांच्या ‘अॅडमिन रूम’मध्ये प्रवेश करत, ड्रॉवरमधून तब्बल १ लाख ९४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. जळगाव शहरात आधीच चोरट्यांची दहशत असताना, आता त्यांनी थेट शाळांना ‘टार्गेट’ केल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
ही घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. यासंदर्भात वर्धमान शाळेचे प्राचार्य आशिष अजमेरा यांनी तत्काळ जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरातील इतर शाळा आणि शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे पुढील तपास करत असून, एकाच रात्री चार शाळांमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.



