पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील तरवाडे शिवारात चोरट्यांनी आपला मोर्चा शेती साहित्याकडे वळवला असून, एकाच रात्रीत दोन शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारी आणि केबल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरवाडे येथील रहिवासी आणि शेतकरी वाल्मीक बाळू पाटील यांनी आपली तक्रार नोंदवली आहे. दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी आपली शेतीची कामे आटोपून घरी परतले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जेव्हा ते शेतात गेले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांच्या शेतातील विहिरीवर लावलेला २५ हजार रुपये किमतीचा ५ एच.पी.चा सोलर पंप (पाण्याची मोटर) आणि ४ हजार रुपये किमतीची ३ एच.पी.ची विद्युत मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.

इतकेच नव्हे, तर चोरट्यांनी शेजारीच असलेल्या ईश्वर देवचंद चौधरी यांच्या शेतातील १५ हजार रुपये किमतीचा सौर ऊर्जा पंप आणि सुमारे १ हजार ५०० रुपये किमतीची ३०० फूट लांब इलेक्ट्रिक वायर असा एकूण ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
परिसरात सातत्याने होत असलेल्या या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरटे ही कृत्ये करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पोलीस नाईक जयंत सपकाळे अधिक तपास करत आहेत.



