जबरी चोरीतील अट्टल चोरटे १२ तासांत जेरबंद; शहर पोलीसांची कारवाई

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर पोलिसांनी जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांच्या आत यशस्वीपणे छडा लावला आहे. शिवाजी नगर उड्डाण पूल ते सुरत रेल्वे गेट दरम्यान रिक्षातून प्रवास करणाऱ्या एकाला मारहाण करून १७ हजार रुपये लुटणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कामगिरीबद्दल जळगाव शहर पोलीस गुन्हे शोध पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रवींद्र बाबुलाल लुले (वय ४७, रा. राजमालती नगर जळगाव) हे रिक्षाने प्रवास करत होते. शहरातील बौद्ध विहाराजवळ गेंदालाल मिल परिसरात त्यांच्यासोबत सहप्रवासी म्हणून बसलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याजवळील १७ हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. या घटनेनंतर रवींद्र लुले यांनी तातडीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहिती आणि तक्रारदाराने दिलेल्या वर्णनानुसार, पोलिसांनी बुधवारी ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अवघ्या १२ तासांच्या आत दोन आरोपींना गेंदालाल मिल परिसरातून अटक केली आहे. वसीम तेली शेर अली तेली (वय ३५, रा. गेंदालाल मिल जळगाव) आणि शेख अर्शद शेख हमीद उर्फ हर्षद अण्णा (वय २६, रा. गेंदालाल मिल जळगाव) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना गुन्ह्याच्या वेळी परिधान केलेल्या कपड्यांनिशी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून चोरी केलेले १२ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.

विशेष बाब म्हणजे, पकडलेला आरोपी वसीम तेली हा नुकताच येरवडा कारागृहातून सुटलेला आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.

Protected Content