जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सावता नगरातील महिलेचे बंद असलेले घर फोडून घरातून सोन्याचे, चांदीचे दागिने, महागडी घड्याळ आणि रोकड असा एकुण ५९ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी ९ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता समोर आली. याप्रकरणी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनिषा गोकुळदास पाटील (वय ४३ रा. सावता नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडले. या घरातून चोरट्यांनी सोन्याचे, चांदीचे तसेच महागडी घड्याळ आणि रोकड असा एकुण ५९ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार ९ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता घरी आल्यावर समोर आला. मनिषा पाटील यांनी नजीकच्या जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे हे करीत आहे.




