भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा गावातील माध्यमिक विद्यालयात शाळेच्या खोलीतून शालेय पोषण आहार चोरून नेल्याची घटना ९ डिसेंबर रोजी समोर आली आहे. या संदर्भात शनिवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे माध्यमिक विद्यालय शाळेमध्ये असलेल्या एका खोलीत शालेय पोषण आहार ठेवण्यात आला होता. ७ ते ९ डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या खोलीतून शालेय पोषण आहाराचे पिशव्या असा एकूण १५ हजार ७०० किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापिका अपर्णा तुकाराम पाटील यांनी वरणगाव पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कंखरे हे करीत आहे.