रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्याजवळ अंकलेश्वर–बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर पारश्याच्या नाल्याजवळ किराणा व्यावसायिकाला मोटरसायकलवर जबरदस्तीने बसवून त्याच्याकडील रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास किराणा व्यावसायिक गोवर्धनदास कोटवाणी यांना एका अनोळखी व्यक्तीने मोटरसायकलवर बसवले. काही अंतरावर त्याचे दोन साथीदार आधीच थांबले होते. तिघांनी मिळून कोटवाणी यांच्या जवळील किराणा व्यवसायातील जमा केलेली रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस कर्मचारी सुनिल मोरे पुढील तपास करीत आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी एक संशयित आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

विशेष म्हणजे, याच अंकलेश्वर–बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर आठवडाभरापूर्वी खानापूर परिसरात मध्य प्रदेशातील व्यापाऱ्याचे सुमारे आठ लाख रुपये लुटण्यात आले होते. त्या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. वारंवार घडणाऱ्या लूटमार घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.



