जळगाव प्रतिनिधी । शहरातील इच्छादेवी मंदीर परिसरातून दोन मोबाईल लांबविल्याची घटना १५ जानेवारी घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला धुळ्यातून अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिरोज शेख इक्बाल (वय-२२) रा. बिस्मिल्ला चौक तांबापूर ह.मु. चाळीसगाव चौफुली, धुळे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रूक्साना राजू तडवी (वय-२८) रा. वडगाव ता. रावेर ह.मु. पंचशील नगर, इच्छादेवी नगर परिसर जळगाव हे १५ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सर्वजण जेवण करून झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरातील दरवाजा उघडून घरातील सुमारे २२ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा धुळ्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, सचीन पाटील, चेतन सोनवणे, असीम तडवी यांनी संशयित आरोपी फिरोज शेख इक्बाल (वय-२२) रा. बिस्मिल्ला चौक तांबापूर ह.मु. चाळीसगाव चौफुली, धुळे येथून आज २५ मार्च रोजी रात्री अटक केली. फिरोज याच्या विरोधात यापूर्वी एमआयडीसी आणि नशिराबाद पोलीसात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. आज न्यायालयात हजर केले असता २८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.