Home क्राईम धावत्या रेल्वेत बॅग चोरीप्रकरणी चोरटा अटकेत ; १.६५ लाखांचे दागिने चोरीचा...

धावत्या रेल्वेत बॅग चोरीप्रकरणी चोरटा अटकेत ; १.६५ लाखांचे दागिने चोरीचा उलगडा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेमधून प्रवाशांचे सामान चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. जळगाव ते भुसावळ दरम्यान झालेल्या चोरीप्रकरणी अवघ्या काही दिवसांत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून या कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी आनंद मोर्या, रा. अयोध्या हे झेलम एक्सप्रेसने प्रवास करत असताना जळगाव ते भुसावळ दरम्यान धावत्या रेल्वेमधून अज्ञात इसमाने त्यांची बॅग चोरी केली होती. या बॅगेमध्ये सुमारे १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने होते. या घटनेनंतर आनंद मोर्या यांनी इटारसी रेल्वे पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने तक्रार दाखल केली होती, जी पुढील तपासासाठी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार हा गुन्हा जळगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन, रा. फातेमा नगर, अल्फरा मशीदजवळ, जळगाव आणि त्याचा साथीदार सोनू जयसिंग बागडे, रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव यांनी केल्याचे निष्पन्न झाले.

ही माहिती मिळताच  राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदारांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गोपनीय पद्धतीने माहिती काढून फातेमा नगर परिसरातून समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन (वय २१) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सदर चोरी ही आपल्या साथीदारासह केल्याची कबुली दिली.

ताब्यात घेतलेल्या आरोपीस पुढील कारवाईसाठी भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणातील दुसऱ्या साथीदाराचा शोध अद्याप सुरू असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही संपूर्ण कारवाई  डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव तसेच राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह पोलीस अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील व रविंद्र कापडणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


Protected Content

Play sound