Home धर्म-समाज ‘या’ भाविकांना ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट म्हणून मिळणार – महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज

‘या’ भाविकांना ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट म्हणून मिळणार – महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल व रावेर तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहात यंदा भक्तांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. सप्ताहात दररोज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात येणार असून पारायणासाठी सहभागी होणाऱ्या भाविकांना ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी फैजपूर येथे झालेल्या सप्ताह नियोजन बैठकीत दिली. या उपक्रमामुळे अध्यात्मिक वातावरण निर्माण होऊन समाजात संस्कार व चिंतनाची परंपरा अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

सप्ताहासाठी सुमारे एक हजार ज्ञानेश्वरी ग्रंथांची व्यवस्था करण्यात येणार आहे. फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी हे सर्व ग्रंथ देणगी स्वरूपात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यांच्या या योगदानामुळे पारायणात सहभागी होणाऱ्या शेकडो भाविकांना ज्ञानेश्वरीचे चिंतन करण्याची संधी मिळणार आहे.

या सप्ताहासाठी विविध संस्था व ग्रामस्थांकडून आर्थिक आणि सेवा स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. फैजपूर ग्रामस्थांकडून एका दिवसाची अन्नदान सेवा देण्यात येणार आहे. वै. विष्णू लालू नारखेडे परिवाराने ५१ हजार रुपये, श्रीमद भागवत कथा समितीने ५१ हजार रुपये, सतपंथ मंदिराने ५१ हजार रुपये, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी २१ हजार रुपये, विरोदा ग्रामस्थांनी ३१ हजार रुपये, नीलकंठेश्वर महिला मंडळाने ११ हजार रुपये तर श्रीराम मंदिर विठ्ठल नामजप मंडळाने २१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली असल्याची माहिती मठ अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी आपल्या मनोगतात दिली.

मानवी जीवन कल्याणकारी बनविण्यासाठी तसेच तरुणाई सुसंस्कृत होण्यासाठी ज्ञानेश्वरी चिंतन अत्यंत आवश्यक असल्याचे मत महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी व्यक्त केले. आजच्या काळात तरुण पिढीने अध्यात्माशी नाते जोडणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व तरुणाईने मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होऊन ज्ञानेश्वरी चिंतन आणि कथेला उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहाचा कार्यक्रम १७ मार्च ते २४ मार्च दरम्यान लोहारा चौफुली, कुंभारखेडा येथे होणार आहे. या धार्मिक सोहळ्यास गुरुवर्य महंत रामगिरी महाराज, गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर, अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले तसेच वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष संदीपन महाराज शिंदे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती नरेंद्र नारखेडे यांनी दिली.

फैजपूर येथील लक्ष्मी स्वामी मंदिरात आयोजित नियोजन बैठकीस नीलकंठ सराफ, किरण चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद महाजन, दूध संघ संचालक नितीन चौधरी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, बापू वाघुलदे, हेमराज चौधरी, चोलदास पाटील, पवन सराफ, सिद्धेश्वर वाघुलदे, नगरसेवक सूरज गाजरे, राजू महाजन, सागर होले, अनंत नेहते, संदीप भारंबे, नरेंद्र चौधरी, चंद्रशेखर चौधरी, अनिल नारखेडे, सुनील नारखेडे, मोहन लोखंडे, काशीनाथ वारके, गणेश पाटील, अनिल पाटील तसेच कुंभारखेडा येथील कार्यकर्ते सुनील चौधरी व सतीश चौधरी, विरोदा येथील योगेश तळेले, बामनोदसह अनेक भाविक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार नरेंद्र नारखेडे यांनी मानले.


Protected Content

Play sound