
नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दलच्या आपल्या भूमिकेत कमालीचा बदल केला असून, भारतावर थेट ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. एकेकाळी “चांगला मित्र” म्हणून गौरवलेला भारत, ट्रम्प यांच्या धारेवर का आहे? यामागे काही राजकीय आणि भूराजकीय गोष्टी आहेत ज्या अमेरिकेला खुपत आहेत.

भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंधांवर गेले काही महिने तणाव वाढला आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही तोडगा निघाला नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी एकतर्फी टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांनी सार्वजनिकरित्या कौतुक केलं होतं. मात्र आता तेच ट्रम्प भारताच्या विरोधात कठोर शब्द वापरत आहेत. भारताविरोधातील या भूमिकेमागे तीन महत्त्वाची कारणं आहेत, जी अमेरिकेच्या धोरणाला विरोध करणारी ठरत आहेत.
पहिलं कारण म्हणजे भारताची रशिया-युक्रेन युद्धावरील तटस्थ भूमिका. अमेरिकेला अपेक्षा होती की भारत रशियाचा निषेध करेल आणि अमेरिकेच्या बाजूने उभा राहील. मात्र भारताने संयमित भूमिका घेत रशियाकडून तेल खरेदी चालू ठेवली. यामुळे अमेरिकेला वाटतं की भारताच्या या निर्णयामुळे रशियाला आर्थिक पाठबळ मिळालं आणि युद्ध लांबणीवर गेलं. चीनसुद्धा रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे, पण ट्रम्प यांचा रोख मुख्यत्वे भारताकडेच आहे.
दुसरं कारण म्हणजे भारताचं ब्रिक्समधील सक्रीय स्थान. अमेरिका भारताला पारंपरिक रशियन मैत्री तोडून पाश्चिमात्य देशांच्या गटात सामील व्हावं, अशी अपेक्षा ठेवत होती. मात्र भारताने ब्रिक्समधील सहभाग कायम ठेवला. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा हा गट अमेरिका आणि युरोपच्या दबावाला पर्याय देण्याचं काम करतोय. भारताचं या गटातील स्थान अमेरिकेच्या रणनीतीला धक्का देणारं ठरत आहे.
तिसरं आणि सर्वात जळजळीत कारण म्हणजे भारताची ‘स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी’ — म्हणजेच भारताचा कोणत्याही देशाच्या दबावाखाली न झुकता स्वतंत्र निर्णय घेण्याचा दृष्टिकोन. ऑपरेशन सिंधुच्या काळात ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिकेमुळे भारत-पाकिस्तानमध्ये शांतता झाली. मात्र भारताने या दाव्याला फारसं महत्त्व दिलं नाही. भारताने स्पष्ट सांगितलं की हे दोन्ही देशांनी आपापसातल्या संवादातून सोडवलं. ट्रम्प यांना भारताचा हा स्वतःचा विचार खुपत आहे.



