Home धर्म-समाज हे आहेत पुण्यातील मानाचे पाच गणपती 

हे आहेत पुण्यातील मानाचे पाच गणपती 


पुणे – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना पुणे शहरात भक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची खरी शान जिथे पाहायला मिळते, ते म्हणजे पुणे! कारण इथेच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करून एक नवा इतिहास घडवला. त्यातूनच निर्माण झालेल्या “मानाचे पाच गणपती” हे आजही पुण्याच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरतात.

पुण्यातील मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती. पुण्याचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या या गणपतीचे मंदिर शहराच्या मध्यवस्तीत कसबा पेठेत आहे. शहाजीराजे भोसले आणि जिजाऊंनी या गणपतीची प्रतिष्ठापना १६३६ मध्ये केली. साडेतीन फूट उंचीची ही स्वयंभू मूर्ती आहे, जी तांदळा स्वरूपात असल्यामुळे खास ठरते. १८९३ मध्ये येथे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला आणि विसर्जन मिरवणुकीची सुरुवातही याच गणपतीपासून होते.

मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती. पुण्याच्या दुसऱ्या ग्रामदेवतेच्या मंदिर परिसरात याची स्थापना केली जाते. विशेष म्हणजे, या गणपतीची मूर्ती दरवर्षी विसर्जित केली जाते आणि नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना होते. या गणपतीच्या मूळ स्थापनेचे श्रेय भाऊ बेंद्रे यांना जाते. पुण्यातील ऐतिहासिक स्थळांमध्ये हे मंदिर एक महत्त्वाचे स्थान राखते.

मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम गणपती. १८८७ मध्ये या उत्सवाची सुरुवात झाली, आणि लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पनेपूर्वीच तो लोकप्रिय झाला. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवाले आणि शेख कासम वल्लाद यांनी याची स्थापना केली. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो, ही या गणपतीची विशेष ओळख आहे.

मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती. महिलांचे आवडते खरेदी ठिकाण असलेल्या तुळशीबागेच्या मध्यभागी ही गणेशमूर्ती उभारली जाते. १९०० साली दक्षित तुळशीबागवाले यांनी या मंडळाची स्थापना केली. फायबरपासून बनवलेली ही उंच मूर्ती आणि त्याच्यासोबत केलेली भव्य आरास पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. हलत्या देखाव्यांची सुरुवातही याच मंडळाने केली होती.

मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरी वाडा गणपती. १८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. त्यावेळी विंचूरकर वाड्यात राहणाऱ्या टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती घडवून आणली. १९०५ पासून केसरी वाड्यात हा उत्सव साजरा होतो आणि या गणपतीची विसर्जन मिरवणूक केळकर रस्त्यावरून निघते.

पुण्याच्या या पाच मानाच्या गणपतींचा इतिहास केवळ धार्मिकच नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक चेतनेने भारलेला आहे. प्रत्येक गणपतीची वेगळी ओळख, स्थापना कालखंड आणि विसर्जनाची परंपरा हे पुण्याच्या गणेशोत्सवाला एक आगळीवेगळी उंची देतात. आजही लाखो पुणेकर आणि बाहेरगावचे भाविक हे गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी या मंडळांकडे आकर्षित होतात.


Protected Content

Play sound