मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, दिल्लीतील नेत्यांनी त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. मात्र, महाराष्ट्रात एका नेत्याच्या मर्जीने पक्ष चालणार नसून कोअर कमिटीला सोबत घेऊनच पक्ष चालवावा लागणार असल्याचे वरीष्ठांनी स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींवर दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांचे आता पूर्ण लक्ष राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपने लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. महाराष्ट्रात देखील 48 पैकी 45 जागी महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा होता. मात्र, भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही. यामागच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीबरोबरच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा देखील आढावा घेण्यात आला. या बैठकीत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. इतकेच नाही तर राज्यात कोणा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नसल्याचे वरीष्ठांनी स्पष्ट केले आहे. तसेच सर्वांना सोबत घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

कोण्या एका व्यक्तीच्या मर्जीने महाराष्ट्रात पक्ष चालू शकत नाही, कोअर कमिटीला सोबत घेऊनच पक्ष चालवावा लागणार आहे, भाजपने एकत्रितपणे काम करायला हवे. महाराष्ट्रातील भाजपच्या सर्वच जुन्या नेत्यांना सक्रीय करायला हवे, आत्तापासूनच उमेदवारांना तयारी सुरू करा, लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या विधानसभा निवडणुकांमध्ये टाळा, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची आहे, महायुतीत समन्वयाचा अभाव नको या सूचना वरीष्ठ नेत्यांनी भाजप नेत्यांना दिल्या आहे.



