नवी दिल्ली, वृत्तसंस्था | महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांसह देशभरातील विविध राज्यातील ६४ मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. यासाठीही २१ ऑक्टोबर रोजीच मतदान घेतले जाईल आणि २४ ऑक्टोबर रोजीच मत मोजणी होणार आहे.
६४ मतदारसंघांपैकी बिहारमधील एक जागा लोकसभेची तर अन्य ६३ जागा विधानसभेच्या आहेत. त्यामध्ये अरुणाचल प्रदेश (१), बिहार (५), छत्तीसगड (१), आसाम (४), गुजरात (४), हिमाचल प्रदेश (२), कर्नाटक (१५), केरळ (५), मध्य प्रदेश (१), मेघालय (१), ओडिशा (१), पुद्दुचेरी (१), पंजाब (४), राजस्थान (२), सिक्कीम (३), तामीळनाडू (२), तेलंगणा (१) आणि उत्तर प्रदेश (११) या राज्यांमधील मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.
असा असेल निवडणूक कार्यक्रम :-
२३ सप्टेंबर – निवडणुकीची अधिसूचना जारी होणार
३० सप्टेंबर – उमेदवारी अर्जासाठी मुदत
१ ऑक्टोबर – उमेदवारी अर्जांची छाननी
३ ऑक्टोबर – अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर – मतदान
२४ ऑक्टोबर – मतमोजणी
साताऱ्यात पोटनिवडणूक नाही :- सातारा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उदयन राजे भोसले यांनी राजीनामा दिला असल्याने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. मात्र तेथील निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केलेली नाही. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.