Home राजकीय बिहारमध्ये नेतृत्वबदलाची चाहूल; नीतीश कुमारांच्या राज्यसभा प्रवेशाची चर्चा

बिहारमध्ये नेतृत्वबदलाची चाहूल; नीतीश कुमारांच्या राज्यसभा प्रवेशाची चर्चा


नवी दिल्ली-वृत्तसेवा ।  बिहारच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा पाटण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यांनी दिल्लीच्या राजकारणात सक्रिय भूमिका घेण्यास तयारी दर्शवली, तर बिहारमध्ये सत्तासमीकरणात मोठा बदल होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

सध्या बिहारमध्ये महागठबंधन सरकार सत्तेत आहे. मात्र, जर नीतीश कुमार राज्यसभेवर गेले, तर सत्तेतील सर्वात मोठा घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री पुढे करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राज्याच्या नेतृत्वात मोठा बदल होऊन नव्या राजकीय समीकरणांची निर्मिती होऊ शकते.

जनता दल (युनायटेड) म्हणजेच जदयू आणि भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांना नीतीश कुमार यांनी राज्यसभेवर जावे, असे वाटत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना पडद्यामागून राजकीय व्यूहरचना आखली जात असल्याची चर्चा अधिक जोर धरत आहे. दिल्लीतील सत्ताकेंद्रात सक्रिय भूमिका घेण्याचा पर्याय नीतीश कुमार यांच्या पुढे ठेवण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, नीतीश कुमार यांनी राज्यसभेत प्रवेश केल्यास बिहारमध्ये नेतृत्वबदल अपरिहार्य ठरू शकतो. अशा परिस्थितीत भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, तर जदयूला केंद्रात अधिक प्रभावी भूमिका मिळवण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत पातळीवर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

बिहारमधील आगामी राजकीय समीकरणांवर या घडामोडींचा दूरगामी परिणाम होऊ शकतो. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसांत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound