सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि सातत्यपूर्ण परिश्रम अत्यंत महत्त्वाचे असून यश मिळवण्यासाठी कठोर मेहनतीला कोणताही पर्याय नाही, असे प्रतिपादन फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी केले. धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन ‘धनोत्सव–२०२५’ च्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी काकडे यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर अभ्यासक्रमाचे सखोल आकलन, आत्मविश्वास, वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक आहेत. शिस्तबद्ध जीवनशैली आणि ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास यश नक्कीच मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता त्यातून शिकून पुढे वाटचाल करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा तापी परिसर विद्यामंडळाचे अध्यक्ष शिरीष मधुकरराव चौधरी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी, मिलिंद शंकर वाघुळदे, चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी, सहसचिव नंदकिशोर आसाराम भंगाळे यांच्यासह कार्यकारी व नियामक मंडळाचे सदस्य संजय काशिनाथ चौधरी, डॉ. शशिकांत सदाशिव पाटील, डॉ. नितीन महाजन आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य प्रा. मनोहर सुरवाडे, प्रा. कल्पना पाटील, प्रा. हरीश नेमाडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे व स्नेहसंमेलन समिती प्रमुख डॉ. जगदीश खरात यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
धनोत्सव–२०२५ निमित्त दि. २ जानेवारी २०२६ रोजी रांगोळी, चित्रकला, मेहंदी, नेल आर्ट, वक्तृत्व, वाद-विवाद, काव्यवाचन, काव्यलेखन, समूह नृत्य, गायन व नृत्य अशा विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालयाच्या एनएसएस, एनसीसी व क्रीडा विभागामार्फत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीमार्फत स्पर्धा परीक्षांद्वारे विविध पदांवर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. यासोबतच प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पेटंट्स तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांबद्दल त्यांचा सन्मान करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करण्यात आला.
महाविद्यालयाचा मानाचा समजला जाणारा आदर्श माता–पिता पुरस्कार कुमारी तेजल रवींद्र वायकोळे (टी.वाय. बी.एस्सी.) यांना प्रदान करण्यात आला. आदर्श विद्यार्थी म्हणून मुजम्मिल शेख सय्यद व आदर्श विद्यार्थिनी म्हणून कुमारी जान्हवी गोविंदा जावळे यांचा सन्मान करण्यात आला. ‘गरीब हुशार होतकरू’ पारितोषिके विज्ञान शाखेतून चारुलता विनायक पाटील, कला शाखेतून लीना प्रदीप गाजरे, वाणिज्य शाखेतून भावना विनोद साखळीकर तसेच कनिष्ठ महाविद्यालयातून कोमल जितेंद्र चौधरी व रोहित सुनील विंचुलकर यांना प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कॅप्टन राजेंद्र राजपूत, प्रा. गोविंद मारतळे, डॉ. नरेंद्र मुळे, प्रा. दिलीप बोदडे व प्रा. स्वाती महाजन यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. जगदीश खरात यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा, कर्तृत्वाचा व सांस्कृतिक कौशल्यांचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.



