मुंबई, वृत्तसंस्था | “बालाकोट हल्ल्यावेळी राफेल असते, तर चित्र वेगळे असते,” असे मत माजी हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी शनिवारी व्यक्त केले. आयआयटी बॉम्बेच्या तंत्रमहोत्सवात धनोआ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी वायुदलाकडील तंत्रज्ञान, आजपर्यंतची युद्धे त्यातील अडचणी अशा मुद्दय़ांचा त्यांनी आढावा घेतला.
राफेलचे कौतुक करताना ते म्हणाले, “राफेलचा मुद्दा दीर्घकाळ रेंगाळला आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे. भारताच्या ताफ्यात राफेल असणे गरजेचेच आहे.” “विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित संशोधने जागतिक बाजारपेठेत नव्या संधी उपलब्ध करून देतात. तांत्रिक उत्पादने निर्यात करण्याची क्षमता भारतात विकसित होऊ शकते,” असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी व्यक्त केले. नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ एरीक मस्किन, डीआरडिओचे संचालक सुधीर मिश्रा यांनीही तंत्रमहोत्सवात शनिवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.