संगमनेर, वृत्तसंस्था | शिवसेनेला समर्थन देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस सकारात्मक असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्यावरुन पक्षात दोन गट आहेत. काही नेत्यांचे अद्यापही काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, असे मत आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर काही कार्यकर्तेही नाराज आहेत. येथील मुस्लिम युवक कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवून सत्तेसाठी शिवसेनेशी आघाडी करू नका अशी विनंती केली आहे. या भूमिकेमुळे मुस्लिम समाज पक्षापासून दूर जाईल, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.
पत्रात लिहिण्यात आले आहे की, “शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षासोबत आघाडी करण्याची पदाधिकाऱ्यांची भाषा म्हणजे एक प्रकारे मुस्लिम समाजाची फसवणूक असून काही पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी हेतूपोटी शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षासोबत जाऊन पक्षाचे नुकसान करुन घेऊ नका”.
“देशाच्या किंवा राज्याच्या राजकीय वाटचालीत काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचाराला साथ व पाठबळ देऊन मुस्लिम समाजाने पक्षाच्या धोरणाला नेहमीच पाठबळ दिले. देशातील राजकीय वातावरण वेगळ्या दिशेने जाणारे असले तरी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तसंच यापुर्वी संगमनेर तालुक्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने नेहमीच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांना विजयी केले,” असेही या पत्रात म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असून मुस्लिम समाजात मोठया प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. पक्ष पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेसोबत आघाडी करण्याची कृती म्हणझे मुस्लिम समाजाची एकाप्रकारे फसवणूक असल्याची भावना पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेरमधील या संघटनेच्या १०० कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.