जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या वेशीपर्यंत लाखो मराठ्यांना आणल्यानंतर सरकारने माघार घेतली. राज्य सरकारने सगेसोयऱ्या कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यातील अडचणी दूर करणारा अध्यादेश काढला. परंतू या अध्यादेशावर ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अध्यादेशावर हरकती उपस्थित करीत त्याला आव्हान देणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी अध्यादेशाबद्दल काही दगाफटका झाला तर मंडल आयोगालाच चॅलेंज कणार असून आपण वकीलांची लवकरच बैठक घेणार असल्याचे म्हटल्याने आता ओबीसी विरुद्ध मराठा राजकारण तापले आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. त्यांचा पुन्हा ऐकरी उल्लेख करीत त्याला माणस मोजायला पुलावर उभे रहायला मी सांगितले होते, पण तो थांबला नाही. त्यामुळे त्याला कोटी मराठे कसे दिसतील ? मराठ्यांची 64 किलोमीटर रांग होती आणि एकूण 27 टप्पे होते असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन काहीही काळजी न करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठ्यांना केले आहे.
माझं सर्वसामान्य ओबीसी बांधवांना सांगणं आहे की, त्याला (छगन भुजबळ) सांगा की कोर्टात आव्हान देऊन गोरगरीब ओबीसीचे नुकसान करू नको असे जरांगे पाटील भुजबळांना इशारा देताना म्हटले आहे. मंडल आयोग कोर्टाने स्वीकारलेला नाही. त्यामुळे छगन भुजबळने जर पुन्हा काड्या केल्या तर मी शंभर टक्के मंडल आयोग चॅलेंज करेन. मंडल आयोगाला चॅलेंज करण्याबाबत लवकरच मी वकिलांची बैठक घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने आमची कुठेही फसवणूक केलेली नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आमच्या पाठीमागे उभे राहतील असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.