…तर धनंजय चौधरी करणार अनोख्या विक्रमाची बरोबरी !

जळगाव- जितेंद्र कोतवाल : लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | रावेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी हे यंदाच्या निवडणुकीतील सर्वात तरूण उमेदवारांपैकी एक तर आहेतच. पण, ते जिंकून आल्यास एका अनोख्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत.

रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी हे यंदा याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. ते यंदाच्या निवडणुकीतील सर्वात तरूण उमेदवार आहेत. या वषच २० ऑगस्ट रोजी ते २५ वर्षांचे झाले आहेत. म्हणजे मतदानाच्या दिवशी ते बरोबर २५ वर्षे दोन महिने इतक्या वयाचे असतील. ते दिवंगत मंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या पेक्षा देखील एका महिना आणि १६ दिवसांनी लहान आहेत. आता या निवडणुकीत त्यांनी बाजी मारली तर ते विधानसभेतील सर्वात तरूण आमदार बनतील हे निश्चीत. आणि येथेच जळगाव जिल्ह्यासाठी एक अपूर्व योगायोग घडून येणार आहे.

जळगाव जिल्ह्यात यापूर्वी दिवंगत ओंकारआप्पा वाघ आणि महेंद्रबापू पाटील हे दोन मान्यवर विधानसभेतील सर्वात तरूण आमदार बनले होते. आता जळगाव जिल्ह्यात धनंजय चौधरी यांना या विक्रमाची हॅटट्रीक साजरी करण्याची सुवर्णसंधी आहे. याआधी पाचोरा मतदारसंघातून १९५७ साली ओंकारआप्पा वाघ हे प्रजासमाजवादी पक्षाच्या तिकिटावरून निवडणूक लढवून विजयी होत तत्कालीन द्वैभाषीक राज्याच्या विधानसभेतील सर्वात तरूण उमेदवार ठरले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांचे वय 25 वर्षांपेक्षा थोडे कमी आढळून आल्याने ते अपात्र ठरले होते. अर्थात येथे सहा महिन्यात पोटनिवडणूक झाली असता यात देखील त्यांनी त्यांनी बाजी मारत सर्वात तरूण आमदार म्हणून लौकीक कायम राखला.

यानंतर १९७८ साली एरंडोल विधानसभा मतदारसंघातून महेंद्रसिंग पाटील यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी जनता पार्टीच्या तिकिटावर लढून विजय संपादन केला होता. ते देखील त्या विधानसभेतील सर्वात तरूण आमदार ठरले होते. आता याच मान्यवरांच्या पंक्तीला जाऊन बसण्याची सुवर्णसंधी रावेरातील महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांना मिळाली आहे. यात ते या संधीचे सोने करत निवडणुकीत बाजी मारणार का ? हे निकालातून दिसणार आहे.

Protected Content