यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मनवेल येथील शेत शिवारा मधील एका शेतकर्याच्या शेतात शेतीपंपा च्या जोडणीसाठी आणलेले तार चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत पोलीस ठाण्यात त्या अज्ञात चोरट्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की मनवेल तालुका यावल येथील अनिल श्रावण पाटील राहणार मनवेल तालुका यावल यांच्या गाव शिवारातील गट क्रमांक २७६ पासून ते अनिल श्रावण पाटील यांच्या शेत गट क्रमांक २८२ पर्यंत राज्य विद्युत वितरण कंपनीने २४ खांब टाकून त्यावर शेतकर्यांच्या शेती पंपासाठी कनेक्शन देण्याकरिता लघुदाबाचे तार टाकले होते.
या २४ खांबावरील ५ हजार ५२० मीटर लांबीचे तार ज्यांची किंमत ७४ हजार ४४१ रुपये होती ते कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केले असून यामुळे एक खांब शेतात कोसळून नुकसान झाले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आला तेव्हा शेतकर्यांनी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या साकळी कक्षाला याबाबत माहिती दिली घटनास्थळी अधिकारी वर्गांनी पाहणी केली व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात साकळी कक्षाचे वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन पांडुरंग पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत. गेल्या अनेक दिवसापासुन परिसरात अशा प्रकारे शेत शिवारातुन मोठया प्रमाणावर महावितरण कंपनीच्या विविध साहित्यांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसुन येत असुन , पोलीस यंत्रणेने शेतकर्यांशी निगडीत या विषयांवर विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.