Home क्राईम सौर ऊर्जा प्रकल्पात मुख्य केबलची चोरी ; वीज निर्मिती ठप्प

सौर ऊर्जा प्रकल्पात मुख्य केबलची चोरी ; वीज निर्मिती ठप्प


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील भोकरीजवळ उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पात अज्ञात चोरट्यांनी मुख्य तांब्याची केबल लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे प्रकल्पातील वीज निर्मिती पूर्णपणे बंद पडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

भोकरी गावाजवळ भोकर नदीकाठी खासगी मालकीचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून विजेची निर्मिती सुरू होती. मात्र सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेजारील शेतातून तारांचे कुंपण तोडून प्रकल्प परिसरात प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर सौर प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी मुख्य तांब्याची केबल ओढून नेण्यात आली. केबल काढताना जागोजागी तोडफोड करण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.

मुख्य केबल चोरीला गेल्यामुळे संपूर्ण वीज निर्मिती प्रक्रिया ठप्प झाली आहे. या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रकल्पाचे मालक प्रकाश अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. नेमकी किती रकमेचे नुकसान झाले आहे, याचा हिशोब घेतला जात असून तांत्रिक पथकाद्वारे नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ञ आणि श्वान पथकाच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित हालचाली आणि वाहनांची माहिती तपासली जात असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी कसून तपास सुरू आहे.

या घटनेमुळे सौर प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुर्गम भागात उभारण्यात आलेल्या अशा प्रकल्पांमध्ये सुरक्षा व्यवस्थेची अधिक कडक अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकारामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.


Protected Content

Play sound