जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारात असलेल्या एका शेतातून महावितरण कंपनीच्या मालकीचे ५० हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २५ आणि २६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या दरम्यान झाली असून, शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सकाळी हा प्रकार समोर आला. याप्रकरणी सायंकाळी उशिरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरण कंपनीकडून जळगाव तालुक्यात वीज वाहिनी टाकण्याचे किंवा दुरुस्तीचे काम सुरू असावे. याच कामासाठी लागणारे उच्च दाब वहिनीचे अल्युमिनियमचे तार सावखेडा शिवारातील गट क्रमांक १४७ आणि १४८ या गटातील शेतामध्ये ठेवण्यात आले होते. २५ सप्टेंबरच्या सायंकाळ ते २६ सप्टेंबरच्या सकाळ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेतला. चोरट्यांनी थेट शेतात ठेवलेल्या महावितरणच्या मालमत्तेवर डल्ला मारला आणि तेथून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे तार चोरून पळ काढला. शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा चोरीचा प्रकार महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला.

कनिष्ठ अभियंत्यांनी दिली फिर्याद
महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता रोहन पाटील यांनी या चोरीच्या घटनेची माहिती जळगाव तालुका पोलिसांना दिली. सार्वजनिक मालमत्तेची चोरी झाल्यामुळे सायंकाळी सहा वाजता कनिष्ठ अभियंता रोहन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत बदर हे करीत आहेत.



