जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली फिडरवर वीजपुरवठ्याच्या जोडणीसाठी आणून ठेवलेले 81 हजार रुपये किमतीचे ॲल्युमिनियमचे तार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी 27 मार्च रोजी दुपारी 12 वाजता उघडकीला आली आहे. या संदर्भात शुक्रवारी 28 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, विद्युत मक्तेदार सुनील लोहार यांचे जळगाव ते शिरसोली फिडरदरम्यान वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यात मोहाडी गावापासून पुढे या वीजवाहिनी टाकण्यासाठी विजेचे खांब उभे केले असून शनिवारी (२९ मार्च) वीजपुरवठा बंद ठेवून हे काम केले जाणार होते. ऐन वेळेवर धावपळ नको म्हणून दोन दिवस अगोदरच मोहाडी गावाजवळील कमानीनजीक ॲल्युमिनियमचे तार आणून ठेवले होते. मात्र ते खांबावर टाकण्यापूर्वीच चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुनील लोहार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान टहाळके करीत आहेत.