अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र येथे पेन्शनचे पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या पिशवीतून १ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि बँकेचे कागदपत्र असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, बाबूलाल शंकरसिंग गिरासे वय-६५, रा. कळंबे ता.अमळनेर हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सेवानिवृत्त असल्या कारणामुळे सोमवारी ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता बाबूलाल गिरासे हे वृद्ध अमळनेर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र येथे पैसे काढण्यासाठी गेले. त्यांनी बँकेतून १ लाख २५ हजार रुपयांची रोकड काढली. त्यानंतर त्यांनी पैसे आणि कागदपत्र पिशवीत टाकून जाण्याच्या तयारीत असताना दोन अनोळखी महिलांनी हातचालकी करून त्यांच्या पिशवीतून १ लाख २५ हजार रुपयांची रोकड आणि कागदपत्रांची पिशवी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बाबूलाल गिरासे यांनी दुसऱ्या दिवशी मंगळवार १२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोन महिलांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोहेकॉ जयंत सपकाळे हे करीत आहे.