रावेर प्रतिनिधी । शहरालगतच्या विश्वकर्मानगर मधील तीन ठिकाणी घरफोडी झाली असून दोन मोटारसायकली चोरण्यात आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, रावेर शहरालगतच्या विश्वकर्मा नगर मधील रहिवाशी प्रशांत लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यांच्या मालकीची पल्सर कंपनीची मोटारसायकल क्रमांक एमएच १९ डीए ४२०६ आणि रविंद्र बाजीराव कोळी यांच्या मालकिची हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल क्रमांक एम एच १९-२३४७ या दोन्ही दुचाकी हँडल लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी १७ जुलैच्या मध्यरात्रीनंतर चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सौभाग्य नगर मधील रहिवाशी विनोद रजाणे यांच्या मालकीच्या घरात कोणीही नाही. याचा फायदा घेत अज्ञात चोरटयांनी घराच्या दरवाजाचा व गेटचा कडी कोंडा तोडून घरात बेकायदेशिर प्रवेश करून सामान अस्ताव्यस्त फेकला. तसेच घरातील १५ हजार रुपये किंमतीचा एलसीडी टिव्ही घरफोडी करुन चोरटयांनी लांबविला. तसेच पुढे माऊली नगर मध्ये रहिवासी असलेले पंकज कोळी व राजेंद्र बोरसे यांचे देखिल बंद घर फोडले असून यांच्या घरातून मात्र काहीही गेले नाही. रावेर शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळे रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.