जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नागझिरी शिवारात असलेल्या गिरणा नदीकाठच्या प्रसिद्ध नागाई-जोगाई मंदिर ट्रस्टच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत देवाचे दागिने आणि रोकड असा एकूण ९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. हा प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नागझिरी शिवारातील नागाई-जोगाई मंदीरात १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही चोरी झाली आहे. यावेळी दोन अज्ञात चोरट्यांनी मंदीराच्या मागील बाजूचे लोखंडी चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी महादेवाच्या पिंडीवरील चांदीचे छत्र आणि दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेली आहे. ही प्रकार मंदीर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या दोन अज्ञात चोरटे दिसून येत आहे. याबाबत मंदीराचे विश्वस्त दिनेश सोनवणे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे हे करीत आहे.




