एरंडोल प्रतिनिधी । जम्मू व काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलात सेवेत असलेल्या जवानाच्या शहरातील नवीन वसाहतीमध्ये असलेल्या साई नगरातील घरात काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सोने,चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची रात्री घडली. यापूर्वी देखील साई नगर,लक्ष्मीनगर व आदर्श नगरमध्ये चोरी झालेली असल्यामुळे नवीन वसाहतींमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी,की शहराबाहेर असलेल्या साई नगर मधील रहिवासी दिपक रतन शिंदे हे काल रात्री पत्नी छायाबाई व दोन मुलांसह तसेच साडू यांचेसह घराच्या गच्चीवर झोपले होते. सकाळी सहा वाजेच्या सुमारास दिपक शिंदे यांच्या पत्नी छायाबाई ह्या खाली आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे व कुलुप तोडले असल्याचे दिसुन आले. त्यांनी पती दिपक शिंदे याना दरवाजा उघडा असल्याचे सांगितल्यामुळे ते त्वरित खाली आले.त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसुन आला. तसेच कपाट देखील उघडे दिसुन आल्यामुळे त्यांनी घरातील वस्तूंची पाहणी केली असता सोने व चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे आढळून आले. यामध्ये दीड तोळे वजनाची एक दानी सोन्याची पोत,आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र,नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टोंगल,अडीच तोळे वजनाची सोन्याची अंगठी,आठ भार वजनाचे चांदीचे दागिने,व नव्वद हजार रुपये रोख असा सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेण्यात आल्याचे त्यांना आढळून आले.
या संदर्भात पोलीसात तक्रार केल्यानंतर घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते. चोपडा विभागाचे उपअधीक्षक सौरव अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाबाबत पोलीसांना सुचना केल्या. याबाबत दिपक शिंदे यानी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक अरुण हजारे पुढील तपास करीत आहेत.
दिपक शिंदे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून सध्या ते जम्मू काश्मीरमध्ये सेवेत असून ते रजा काढून घरी आले आहेत. दरम्यान, शहरातील नवीन वसाहतींमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.एक मे रोजी शहरातील आदर्श नगरातील तीन घरांमध्ये देखील चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.