रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील शेतशिवारात मेंढपाळाच्या सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्यानंतर रावेर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा लावत आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे संपूर्ण चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मेंढपाळ खंडू भिका सरगर (रा. बऱ्हाणपूर) यांनी वत्सलाबाई रामदास पाटील (रा. नेहता) यांच्या शेतात मेंढ्या बसवलेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी संसारोपयोगी साहित्य तसेच सोने-चांदीचे दागिने बैलगाडीवरील पेटीत सुरक्षित ठेवले होते. मात्र अज्ञात व्यक्तीने ही पेटी फोडून दागिने व साहित्य चोरी केल्याची तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथक व बिट अमलदारांना तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या. घटनास्थळ शेतशिवारात असल्याने तांत्रिक तपासात अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष साक्षीदारांची चौकशी करण्यात आली असता घटनास्थळी एक महिला संशयास्पद हालचाली करताना दिसल्याची माहिती मिळाली. मात्र सुरुवातीला तिची ओळख पटविणे कठीण झाले होते.
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संशयित महिलेची ओळख पटवून तिला ताब्यात घेतले. सुरुवातीच्या चौकशीत ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. मात्र विश्वासात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली व चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांकडे सुपूर्द केला.
संशयित महिलेकडून १,४२,५०० रुपये किमतीचे ९९५ ग्रॅम वजनाचे तीन चांदीचे कडे तसेच ३०,००० रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली विजय चौधरी, विक्रम सिसोदे, चैतन्य नारखेडे, रुबाब तडवी तसेच गुन्हे शोध पथकातील प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, सुकेश तडवी आणि गजानन बोने यांनी ही यशस्वी कारवाई केली



