जळगाव प्रतिनिधी । शहरातील पंचमुखी हनुमान मंदीराजवळील पेट्रोल पंपासमोर अज्ञात तिघांनी दुचाकीवर येवून पायी जाणाऱ्या तरूणाच्या पॅन्टच्या खिश्यातून ११ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयुर गणेश वडनेरे (वय-२५) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव हा तरूण कामाच्या निमित्ताने पांडे डेअरी चौकाकडून सिंधीकॉलनीकडे जात असतांना मागुन भरधाव वेगाने दुचाकीवरून येणाऱ्या अज्ञात तिघांनी मयुरच्या पॅन्टच्या खिश्यातील ११ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून घेतला. आरडाओरड केली असता तिघे दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी मयुर वडनेरे याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि विशाल वाठोरे करीत आहे.