मुसळधार पावसामुळे झालेल्या पाण्याच्या प्रवाहात तरूण गेला वाहून

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे शहर आणि आसपासच्या भागात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात सायंकाळच्या सुमारास कात्रज लेकटाऊन येथून २६ वर्षीय अक्षय साळुंखे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती. या युवकाचा अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांपासून शोध सुरू होता. आज सकाळी अक्षय साळुंखे या तरुणाचा मृतदेह आढळून आला.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज लेकटाऊन येथून २६ वर्षीय अक्षय साळुंखे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती. त्याबाबतची माहिती मिळाल्यावर, गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून वाहन पाठवत शोध घेण्यात आला होता. पंरतु धरण क्षेत्रातून वाढता विसर्ग आणि पाण्याचा प्रवाह पाहता अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यादिवशी शोध घेऊनही युवक सापडला नाही. दुसऱ्या दिवशी घटनेचे गांभीर्य ओळखून गंगाधाम आणि कात्रज अग्निशमन वाहन लेकटाऊन, जनता अग्निशमन वाहन शंकर महाराज मठाजवळ, स्वामी विवेकानंद पुतळा आणि आज कसबा येथील वाहनाने मनपाजवळील नदीपात्र येथे रश्शी, गळ, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग याचा वापर करत युद्धपातळीवर शोधकार्य सुरु होते. आज सकाळी दहा वाजता मनपा भवनालगत असलेल्या डेंगळे पुलाखाली एक मृतदेह पाण्यात आढळून आला, तो अक्षय साळुंखेचा असल्याचे स्पष्ट झाले.

Protected Content