जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील पंचवटी नगरात तरुणाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गिरिजा शंकर नन्नवरे वय-३२, रा. पंचवटी नगर, आव्हाने शिवार, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजता दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजाचे लॉकतोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ६३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गिरीजा नन्नवरे यांनी जळगाव तालुका पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय भालेराव करीत आहे.