अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील ढेकू रोडवरील ओम नगर मधील एका तरुणाचे बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे दागिने आणि चांदीच्या मूर्ती असा एकूण ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, विशाल अविनाश पाटील वय-२८, रा. ओम नगर, ढेकू रोड अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान १० ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान त्याचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने आणि चांदीची मूर्ती असा एकूण ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना रविवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली. यासंदर्भात विशाल पाटील याने अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे हे करीत आहे.